वाशिम : सामाजिक न्याय विभागासह महिला व बालविकास विभाग, आदिवासी विकास विभागामार्फत संचालित अनुदानित वसतीगृहे व निवासी शाळा, आश्रमशाळा तसेच दिव्यांग मुला-मुलींकरिता स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या कार्यशाळा, निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानात ३ आॅगस्ट रोजी वाढ करण्यात आली आहे.राज्यातील आर्थिकदृष्टया दुर्बल तसेच मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास विभाग, आदिवासी विभाग तसेच विजाभज, ओबीसी व विमाप्र विभागामार्फत संचालित अनुदानित वसतीगृह, निवासी शाळा व आश्रमशाळा चालविण्यात येतात. तसेच दिव्यांग मुला-मुलींकरिता स्वयंसेवी संस्थेमार्फत कार्यशाळा, निवासी शाळा तसेच मतीमंदांच्या कार्यशाळा कार्यरत आहेत. सदर वसतिगृह, निवासी शाळा, आश्रमशाळा तसेच कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना परिपोषण अनुदान देण्यात येते. महागाईच्या काळात सदर अनुदान दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कमी पडत असल्याने अनुदान वाढविण्याची मागणी समोर आली होती. याची दखल घेत परिपोषण अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागासह अन्य विभागामार्फत संचालित अनुदानित वसतीगृहे, निवासी शाळा व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना ९०० रुपयाऐवजी आता १५०० रुपये अनुदान मिळेल तर मतीमंद व दिव्यांगांना ९९० रुपयाऐवजी १६५० रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना थोडाफार दिलासा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 6:09 PM