इंझोरी: बुजलेल्या गावतलावाचे लोकसहभागातून श्रमदानाने खोलीकरण केल्याचा फायदा इंझोरीवासियांना झाला आहे. यामुळे गावातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे.
मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे पुरातन गावतलाव आहे. पूर्वी या तलावाचा गावकऱ्यांना आधार होता; परंतु गावात विहिरी, कूपनलिका खोदल्यानंतर तलावाकडे दुर्लक्ष झाले आणि हा तलाव बुजला. या तलावात साचणाऱ्या पाण्यामुळे गावातील पाणीपातळी कायम राहत होती; परंतु तो बुजल्यामुळे गावातील जलस्त्रोत लवकरच आटू लागले आणि गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन इंझोरी येथील ग्रामचेतना मंडळाने या तलावाचे खोलीकरण श्रमदानातून करण्याची संकल्पना मांडली. त्याला गावकऱ्यांचा प्रतिसादही लाभला. उन्हाळ्याच्या दिवसांत तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी या तलावासाठी श्रमदान केले. आता या तलावात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला असून, यामुळे गावातील पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्याचा फायदा गावकºयांना होत असून, पाणीटंचाईची समस्या आता हद्दपार झाली आहे.