लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांची कामे पूर्णत्वास येत आहेत. यामुळे दळणवळण सुविधा अद्ययावत झाली असली तरी शेतकऱ्यांची मात्र पंचाईत झाली आहे. महामार्गाची कामे करताना मार्ग अधिकाधिक समतल करावा लागला. त्यात कुठे खूप मोठ्या प्रमाणात उंची वाढली, तर कुठे कमी झाली. त्यातच मार्गालगत नाल्याही खोदण्यात आल्या. त्यामुळे मार्गालगतच्या शेतात वाहन नेणे कठीण झाले आहे.जिल्ह्यात कारंजा-वाशिम, मालेगाव-मेहकर, अकोला-हिंगोली, कारंजा-मानोरा, अकोला-आर्णी आदि राष्ट्रीय महामार्गांची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने करण्यात येत आहेत. यातील काही मार्गांची कामे आता पूर्णत्वास आली असून, मार्गाचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. तथापि, काही ठिकाणी मार्गाची उंची सहा ते आठ फूट उंच झाली, तर काही ठिकाणी पूर्वीपेक्षा कमी झाली. त्यामुळे या मार्गालगत असलेल्या शेतीत वाहने नेण्यात अडचणी येत आहेत. मार्गाच्या उंचीनुसार शेतात मार्ग करण्यासाठी शेतकºयांना शेतीतच मोठी जागा सोडावी लागत आहे. त्यामुळे शेतजमिनीच्या पेरणीचे क्षेत्र घटत आहे. याचा फटका शेतकºयांना कायमच सोसावा लागणार आहे. कारंजा-मानोरा, वाशिम-कारंजा, मानोरा-मंगरुळपीर आणि मंगरुळपी-वनोजादरम्यान अनेक शेतकºयांना ही अडचण येत आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामातील विविध कामांसाठी शेतकºयांना वाहने न्यावी लागत आहेत; परंतु मार्ग उंच झाल्याने वाहने शेतालगत मार्गावरच उभी करून साहित्य नेण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचलि यंत्राद्वारे फवारणी, डवरणी करणे अशक्य झाले असून, खताची गाडीही मार्गावर उभी करून डोक्यावर खताची पोती न्यावी लागत आहेत. यावर तोडगा काढावा तरी काय, असा प्रश्न शेतकºयांना आता पडला आहे.
नाल्यांच्या कामामुळेही अनेकांची पंचाईतराष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे रस्त्यालगतच्या नाल्या बुजल्याने शेतात पाणी शिरून अनेकांचे गतवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे यंदा कंत्राटदारांनी महामार्गालगत नाल्यांचे खोदकाम केले. तथापि, काही शेतकºयांची शेती खाली असल्याने पावसाचे पाणी त्यांच्या शेतीत साचते.वाहतुकीसाठी तांत्रिकदृष्ट्या मार्गांची कामे योग्यमहामार्गाची कामे करणाºया कंत्राटदार कंपन्यांनी अंदाजपत्रक आणि ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार वाहतूक सुरळीत व्हावी, ही काळजी घेत महामार्गांची कामे केली आहेत. मार्गावरील चढउतार शक्य तेवढ्या प्रमाणात कमी केले आहेत. त्यामुळे ही कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत.
आमच्या शेतालगत महामार्गाची उंची सहा फुटाहून अधिक झाली आहे. त्यामुळे शेतात वाहन नेणेच काय, तर पायी जाणेही कठीण झाले आहे. त्यामुळे विविध कामांत अनेक अडचणी येत आहेत. आता शेतातील मोठी जागा सोडून शेतात भराव टाकत रस्ता तयार करावा लागेल. यामुळे आमचे कायमच नुकसान होणार आहे.- नंदकिशोर तोतला, शेतकरी, इंझोरी. ता. मानोरा