वाशिम : रिफाइंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाला मागणी वाढत असल्यााचे दिसून येते. मात्र, असे असले, तरी तेल घाण्याचे असो की, रिफाइंड ते आहारात कमीच वापरावे, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञांसह आहारतज्ज्ञांनी दिला.
तेल हा सर्वच घरांमध्ये स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक आहे. आहारात तेलाचा जास्त वापर केल्याने रक्तदाब, स्थूलता, हृदयरोग आदी विकारांना आमंत्रण मिळते. चुकीच्या पद्धतीने स्वयंपाकासाठी तेल वापरणे, हॉटेलमधील तळलेले पदार्थ वारंवार खाणे या सगळ्याच गोष्टी अपायकारक ठरतात. त्यामुळे आहारामध्ये मोजून मापूनच तेलाचा वापर योग्य असल्याचा सल्ला डॉक्टरांसह आहार तज्ज्ञांनी दिला.
०००००००००००
...म्हणून वाढत आहेत हृदयरोगी
तेलाचा अतिवापर करणे आरोग्यासाठी घातकच आहे. अलीकडे तेलाचा अधिक वापर करणारे हृदयरुग्ण वाढत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. बदलून तेलाचा आहारात वापर न करता, एकच एक तेल सातत्याने वापरले जाते. त्यामुळे एक प्रकारचे घटक तेलातून मिळते. बदलती जीवनशैली, जंक फूड हेही यामागील कारण आहे.
०००००००००००००
लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय
जिल्ह्यात साधारण १० ते १५ वर्षांपूर्वी घाणीवरूनच तेल आणले जायचे. दरम्यानच्या काळात विविध कंपन्यांचे रिफाइंड तेल बाजारात आले. ते स्वस्त असल्याने घाणीच्या तेलाची मागणी घटली. परिणामी, अनेक घाण्या बंद पडल्या. जिल्ह्यात सध्या चार ते पाच तेलघाणी आहेत.
०००००००००००००००००
आहारतज्ज्ञ काय म्हणतात?
रिफायनिंग तेलात वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रियाच केल्या जातात. निरोगी आरोग्यासाठी शेवटी रिफाइंड असो की, लाकडी घाण्याचे, तेलाचे आहारातील प्रमाण कमीच असले पाहिजे. तेल बदलून रोटेशनमध्ये वापरावे. वारंवार गरम केलेले तेल वापरू नका.
- सुनिता लाहोरे, आहारतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम.
०००००००००००००
रिफाइंड तेल घातक का?
रिफायनिंग तेलात वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रियाच केल्या जातात. अशुद्धपणा घालवण्यासाठी ॲसिड वापरले जाते. त्यातील व्हिटॅमिन्सही निघून जातात. अतिप्रमाणात तेलाचा वापर आहारात करणे धोक्याचेच आहे, असे वाशिम येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ.सिद्धार्थ देवळे, डॉ.सचिन पवार यांनी सांगितले.