लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कुष्ठरोगाबाबत असलेले समज, गैरसमज आणि पर्यायाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाशिम जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याचे दिसत आहे. यंदा ५ सप्टेंबरपासून राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेतील आकडेवारीवरून ही बाब उघडकीस आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात यंदा शोधलेले २१ कुष्ठरुग्ण मिळून एकूण १४८ कुष्ठरोगी आहेत. जिल्ह्यात ५ सप्टेंबरपासून कुष्ठरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ११ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत १ हजार ४१ चमूंनी जिल्ह्यातील ११ लाख १८ हजार ७४९ लोकसंख्येपैकी ८ लाख १३ हजार ६७८ लोकांची तपासणी करण्यात आली असून, यात ३ हजार ७७७ संशयित रूग्ण आढळले. त्यापैकी २१ जणांना कुष्ठरोगाची लागण झाली असून, यामध्ये सांसर्गिक प्रकारातील ८ आणि असांसर्गिक प्रकारातील १३ रुग्णांचा समावेश आहे. गतवर्षी या मोहिमेत १० लाख ३५ हजार ७०६ लोकांची तपासणी करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष कुष्ठरोग झालेले १२७ रुग्ण आढळून आले. यामध्ये ८१ सांसर्गिक प्रकारातील, तर ४६ असांसर्गिक प्रकारातील आहेत. त्यामुळे २०१६ मधील १२७ आणि यंदाच्या शोध मोहिमेतील २१ रुग्ण मिळून एकूण १४८ कुष्ठरुग्ण जिल्ह्यात असले तरी, प्रत्यक्षात उपचाराखाली १०५ रुग्ण आहेत. त्यावरून अद्यापही कुष्ठरोग निर्मुलनाबाबत जनताच गंभीर नसल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात कुष्ठरोग सर्वेक्षण आरोग्य प्रशिक्षण केंद्र नागपूरचे सहाय्यक संचालक तथा राज्यस्तरीय झोलन अधिकारी डॉ. विजय डोईफोडे, वाशिमचे सहाय्यक संचालक डॉ. अश्विनकुमार हाके, अवैद्यकीय सहाय्यक जे. आर. ठाकरे, अवैद्यकीय पर्यवेक्षक ए. एस. लोणारे यांच्या मार्गदर्शनात कुष्ठरुग्ण शोध मोहीम आणि सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 7:19 PM
कुष्ठरोगाबाबत असलेले समज, गैरसमज आणि पर्यायाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाशिम जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याचे दिसत आहे. यंदा ५ सप्टेंबरपासून राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेतील आकडेवारीवरून ही बाब उघडकीस आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात यंदा शोधलेले २१ कुष्ठरुग्ण मिळून एकूण १४८ कुष्ठरोगी आहेत.
ठळक मुद्देजिल्ह्यातील वास्तवयंदाच्या शोध मोहिमेत ८.१३ लाख लोकांची तपासणी