पूर्वी बरीच शेतीकामे ही मजुरांच्या मदतीने केली जात होती, परंतु आता शेतात आधुनिक तंत्रज्ञानाने शिरकाव केला आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. पावसाळ्यामध्ये महिला मजुरांना किमान तीन ते चार महिने शेतातील कामकाजासाठी रोजगार मिळायचा, परंतु कालांतराने पिकातील तनाचे निर्मूलन करण्यासाठी तणनाशक निघाले आणि मजुरांचा रोजगार हिरावल्यामुळे त्यांचे आर्थिक गणीत बिघडले. दरवर्षी शेतकरी शेतीची मशागत करतो, बियाणे पेरणी केल्यानंतर उगवण्या झाल्यास, शेतात तणही मोठ्या प्रमाणात उगवले जाते. त्यासाठी निंदण, खुरपणी मजूर वर्गाकडून केली जात होती, परंतु आता बहुतांश शेतकरी आंतर मशागतीची कामे मजुरांकडून न घेता, तणनाशकाचा सर्रास वापर करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला मजुरांना कामाच्या शोधात रोजगारासाठी भटकंती करावी लागते. तालुक्यातील काही भागांतील अनेक महिला खरीप हंगामातही शेतात कामावर असल्यामुळे त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जात होता. मात्र, सध्या तणनाशकाचा वापर वाढल्याने, काही मजूर रोजगारापासून वंचित आहेत.
तणनाशकाच्या वाढत्या वापराचा मजुरांच्या रोजगारावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:27 AM