कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळविणे व नागरिकांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी उपाय असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीसाठी रिसोड शहरात गर्दी होत आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील ५०० युवकांचे लसीकरण करण्यात आले, तर ४५ वर्षांवरील आजपर्यंत २६,२४५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथे कोरोनाने थैमान घातले होते. त्याच्यापाठोपाठ करडा येथेही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत होती. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य प्रशासनास खबरदारी घेऊन रुग्णदर कमी करण्यात यश आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लसीकरण हा महत्त्वाचा भाग आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा वेग तालुक्यात वाढलेला आहे. लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होत असताना दिसत आहे. लसीचा तुटवडा नेहमीच जाणवत आहे. लसीचा पुरेपूर साठा नसल्यामुळे अनेक नागरिक लसीकरण केंद्रावर चकरा मारत आहेत. ६ मे रोजी लसीचा साठा उपलब्ध होताच नागरिकांनी एकच गर्दी केली. लसीचा साठा मुबलक नसल्यामुळे काही दिवस दुसरा डोस बंद करण्यात आला होता. गुरुवारपासून पुन्हा दुसरा डोस देणे सुरू केले आहे. लसीच्या उपलब्ध साठ्यानुसार १८ वर्षांवरील सर्वांनाच डोस देण्यात येणार आहे. तरी गर्दी न करता नियमाचे पालन करून रजिस्ट्रेशननुसार, दिनांकानिहाय हजर राहावे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. धम्मपाल मोरे यांनी सांगितले.
...
केंद्रनिहाय झालेले लसीकरण
मोप ३,७६६
कवठा ५,९३५
केनवड २,९१४
मांगुळ झनक ५,००८
रिसोड ८,६२२
एकूण २६,२४५