यासंदर्भात २१ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जांभरुण नावजी व जांभरुण भिते या दोन गावांची मिळून ग्रामपंचायत आहे. या गावांमध्ये एक हजारपेक्षा अधिक मातंग समाजबांधव राहतात. जांभरुण नावजी येथील गट क्र. ७२ ई वर्ग मधील काही जागा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजमंदिर व समाजाच्या कामाकरिता ऑगस्ट २०१३ मध्ये मागणी केल्यानंतर ३० सप्टेंबर २०१३ रोजी झालेल्या सभेत नाहरकत ठराव मंजूर झाला. त्यानुसार समाजबांधवांनी जागा ताब्यात घेवून तार कंपाऊंड व ओटा बांधला आहे. याठिकाणी समाजाचे वेगवेगळे कार्यक्रम होतात. परंतु, शासनाने वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला गट क्रमांक ७२ मधील ४ एकर जमीन देण्याबाबत आदेश पारित केला आहे. ग्रामपंचायतने मंजूर केलेली ६ आर. जमीन सोडून इतर जमीन देण्यास समाजबांधवांची हरकत नाही. कारण, या जागेशी समाजाच्या भावना जुळलेल्या आहेत. त्यामुळे सदर जागेमध्ये कुणाचाही हस्तक्षेप होवू नये, अशी मागणी करण्यात आली. उपोषणात ज्योती डोंगरे, सुनिता रणशिंगे, पूजा बदर, कल्पना कांबळे, यमुना चव्हाण, सरस्वती डोंगरे, लीलाबाई चव्हाण, मीनाक्षी सोनुने, लक्ष्मी भोसले, गंगाबाई वानखेडे यांचा समावेश आहे.
समाजमंदिराच्या जागेसाठी बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:41 AM