वाशिम: जिल्ह्यातील चिंचाळा (ता.मंगरूळपीर) येथे स्मशानभूमीसाठी लागणाऱ्या जमिनीचा ७/१२ आहे; मात्र स्मशानभुमी आजतागायत उभी झालेली नाही. प्रशासकीय उंबरठे झिजवूनही फायदा झाला नसल्याने अखेर ठरल्याप्रमाणे शिवाजी शंकर गजभार यांनी सोमवार, ४ डिसेंबरपासून मंडपात सरण रचून त्यावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
चिंचाळा येथे स्मशानभूमीची सुविधा अद्याप उभारण्यात आलेली नाही. ज्यांच्याकडे शेती आहे, ते त्याठिकाणी कुटूंबातील मृतकांवर अंत्यसंस्कार करतात; मात्र जे भूमिहिन आहेत, त्यांच्यासमोर मृतदेह जाळण्याचा यक्षप्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, चिंचाळावासीयांचे संपूर्ण आयुष्य चिंतेत गेले, बेरोजगारी, आर्थिक चणचण आणि कुटूंब पोसण्याची चिंता, या सर्व विवंचनेतून मृत्यूनंतर मुक्तता होत आहे; परंतू मरणानंतर मृतकांना जाळणार कुठे, असा प्रश्न शोकाकुल कुटूंबांसमोर उभा राहत आहे.
दरम्यान, हा प्रश्न निकाली निघण्यासाठी स्मशानभूमीची जागा मोकळी करून गावकऱ्यांच्या ताब्यात द्या; अन्यथा ४ डिसेंबरपासून गावातीलच बजरंगबलीच्या मंदिरासमोर सरण रचून त्यावर उपोषण करू, असा इशारा शिवाजी गजभार यांनी दिला होता. त्याची दखल न घेतल्याने अखेर त्यांनी ठरल्याप्रमाणे ४ डिसेंबरपासून सरणावर बेमुदत उपोषण अंगिकारले आहे. याप्रकरणी प्रशासकीय यंत्रणा काय भूमिका घेणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.