वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी २८ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणारे कंत्राटी (आयुष) वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी हे आंदोलनात सहभागी झाल्याने कामकाज प्रभावित झाले.
संपकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनानुसार, २८ ऑक्टोबरपासून संपूर्ण राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मागील १५ वर्षांपासून आरोग्य विभागामध्ये अनेक डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसचे अतांत्रिक अधिकारी व कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर सेवा देत आहेत.
सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते; मात्र अद्यापही समायोजन झाले नाही. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संप पुकारण्यात आला. यावेळी डॉ. सय्यद अजमल,डॉ. प्रीती तिडके,सीमा कांबळे,महेश बारगजे ,स्वाती राऊत,पूनम नाकट,नम्रता जोशी,प्रियंका सुर्वे,सुषमा बिकट,शिल्पा तायडे, ममता कोटे,सुवर्णा पाटील,किरण भगत, अविनाश अवसारे आदींची उपस्थिती होती.