लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यानंतर आता ज्येष्ठ, अतिजोखीम गटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. ज्येष्ठ, अतिजोखीम गटातील नागरिकांसाठी मार्चपासून या लसीकरणाचा शुभारंभ होण्याचे संकेत असून, त्याआनुषंगाने आरोग्य विभागातर्फे पूर्वतयारी केली जात आहे.देशात २०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर महिन्यापर्यंत देशात कोरोनाने कहर केला. वाशिम जिल्ह्यातही सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढला होता. दरम्यान, कोरोना विषाणू प्रतिबंधक लस आल्याने देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सरकारी व खासगी क्षेत्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांना कोरोना प्रतिबंधक लस (कोविशिल्ड) देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (शहरी व ग्रामीण) अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. दरम्यान, मार्च महिन्यापासून ५० वर्षांवरील ज्येष्ठ व अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लस मिळण्याचे संकेत असून, त्याआनुषंगाने आरोग्य विभागातर्फे पूर्वतयारी करण्यात येत आहे. मार्च महिन्यापासून ज्येष्ठ व अतिजोखीम गटातील नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक व अतिजोखीम गटातील नागरिक किती आहेत, लस उपलब्धता याआनुषंगाने माहितीचे संकलन केले जात आहेत. अतिजोखीम गटातील नागरिकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याने आणि सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मार्च महिन्यापासून ज्येष्ठ व अतिजोखीम गटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळण्याचा अंदाज आरोग्य विभागातर्फे वर्तविण्यात येत आहे.
पुरेशा प्रमाणात लस उपलब्धजिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, आवश्यकतेनुसार वरिष्ठ स्तरावरून डोस प्राप्त होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ व अतिजोखीम गटातील नागरिकांना मार्च महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा शुभारंभ झाला, तर लसीचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात महसूल, पोलीस, नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. मार्च महिन्यापासून ज्येष्ठ नागरिक व अतिजोखीम गटातील नागरिकांची कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याआनुषंगाने पूर्वतयारी केली जात आहे. कोरोना प्रतिबंधक लस ही पूर्णत: सुरक्षित असून, मोबाइलवर संदेश प्राप्त होताच संबंधितांनी लस घ्यावी.
- डॉ. मधुकर राठोडजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम