लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: येथील एमआयडीसीमध्ये रस्ते, विद्यूतची प्रभावी सोय उभी झाली असली तरी सर्वांत मोठी असलेली पाण्याची समस्या मात्र अद्याप सुटली नसल्याने मोठे उद्योजक याठिकाणी उद्योग उभारण्यास तयार नाहीत. दरम्यान, जवळच असलेल्या एकबूर्जी प्रकल्पावरून पाण्याची गरज भागविणे शक्य आहे; परंतु त्यासाठी प्रथम एकबूर्जी प्रकल्पाची उंची वाढवावी लागणार असून त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक प्रयत्नांची नितांत गरज असल्याचा सूर शहरातील नागरिकांमधून उमटत आहे. वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. असे असले तरी एकमेव पाटणी चौक वगळता शहरात कुठेही मोठी बाजारपेठ उभी झालेली नाही. लघुव्यवसायांच्या माध्यमातून काही सुशिक्षितांनी बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, त्याचे प्रमाणही सिमित आहे. दुसरीकडे २१५ हेक्टरच्या येथील ‘एमआयडीसी’मधील ९७ भुखंडांपैकी केवळ ७ ते ८ भुखंडांवरच उद्योग सुरू झाले आहेत. तथापि, उद्योगांची संख्या वाढल्यास शहरातील अनेक बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळणे शक्य आहे. त्यासाठी उद्योजकांना लागणाºया पाण्याची अडचण सुटणे नितांत आवश्यक असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय स्तरावरून शासनाकडे पाठपुरावा व्हायला हवा, अशी मागणी होत आहे.
आमदार लखन मलिक यांचा पाठपुरावा निष्फळ!एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढविण्यासंदर्भात वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लखन मलिक यांनी शासनाकडे सलग पाठपुरावा केला. मात्र, तांत्रिक अडचणींचे कारण समोर करून शासनाने या मागणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. मलिक यांचा अपवाद वगळता इतर कुठल्याही लोकप्रतिनिधीने हा विषय शासनाकडे लावून धरला नाही. दरम्यान, येत्या हिवाळी अधिवेशनात तरी या प्रश्नावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून आवाज उचलल्या जावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.