- संतोष वानखडे वाशिम : कोरोनामुळे लाॅकडाऊनदरम्यान ठप्प झालेले एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगधंदे सप्टेंबर महिन्यापासून पूर्वपदाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येते. परप्रांतीय मजूर, कामगारही परत आले असून, बेरोजगार हातांना काम मिळाले आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एप्रिल ते जून या दरम्यान उद्योगधंदे ठप्प होते. जिल्हयात वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, अमानी (ता. मालेगाव), मानोरा येथे एमआयडीसी क्षेत्र आहे. रिसोड येथे एमआयडीसी क्षेत्र अद्याप नाही. उद्योगधंद्याच्या बाबतीत वाशिम जिल्हा तसा मागास म्हणून ओळखला जातो. वाशिम येथील एमआयडीसी क्षेत्रात फारशा भाैतिक सुविधा उपलब्ध नसल्याचा फटका उद्योग सुरू होण्यावर होत आहे. यंदा कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. यामधून उद्योग क्षेत्रही सुटू शकले नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या विविध अडचणींशी दोन हात करीत एमआयडीसीतील लघुउद्योग व अन्य मोठ्या उद्योगधंद्यांची सध्या वाटचाल सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाल्याने या क्षेत्राला जवळपास साडेसात हजार कोटींचा फटका बसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. जून महिन्यापर्यंत मागणी, कामगारांचा अभाव, कच्च्या मालाची कमतरता, वाहतूक व्यवस्था आदी अडचणींमुळे उद्योग प्रभावित होते. अनलाॅकच्या टप्प्यात कृषीआधारीत उद्योगांमध्ये गती आल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जवळपास ११०० परप्रांतीय मजूर, कामगार परतले असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
जिल्ह्यात 7500 कोटींचा फटका बसला
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन आहे. एप्रिल ते जून या महिन्यात एमआयडीसी क्षेत्रातील व अन्य लहान, मोठे उद्योग प्रभावित होते. या दरम्यान जिल्ह्यातील उद्योग जगताला जवळपास ७,५०० कोटींचा फटका बसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.