लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोनाकाळात २०२० मध्ये जिल्ह्यात बालमृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये १४ वर्षाआतील ४७ बालकांचा मृत्यू झाला होता. हेच प्रमाण २०२० मध्ये ३४ पर्यंत खाली आले आहे.देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. एप्रिल ते जून यादरम्यान लाॅकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाली. या कालावधीत लहाने बालके घरातच होती. शाळाही बंद असल्याने दिवाळीपर्यंत बालके शक्यतोवर घराबाहेर पडली नाही. तसेच मास्कचा नियमित वापर असल्याने अन्य साथीच्या आजारांपासून बालके सुरक्षित राहिली. २०१९ मध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लू आदी आजारांनी डोके वर काढले होते. २०२० मध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लूला बालके बळी पडली नसल्याचे दिसून येते. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये बालकांच्या मृत्युसंख्येत घट झाल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये ४७ तर २०२० मध्ये ३४ बालकांचा मृत्यू झाला.कोरोनाकाळात घेतली विशेष दक्षताकोेरोनाकाळात माता, बालकांनी मास्कचा वापर केला तसेच यादरम्यान घराबाहेर शक्यतोवर कुणी पडले नाही. कोरोनाचा सर्वाधिक धोका बालकांना असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे मातांनी बालकांना घराबाहेर पडू दिले नाही. आरोग्य विभागातर्फेदेखील विविध मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली.
कोरोनाकाळात मुले शक्यतोवर घरातच होती. मास्कचा वापरही होता. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लू आदी आजारांना मुले बळी पडली नाहीत.- डाॅ. विजय कानडेबालरोग तज्ज्ञ, वाशिम
कोरोनाकाळात एप्रिल ते जुलै महिन्यापर्यंत लहाने बालके शक्यतोवर घराबाहेर पडली नाहीत. साथरोग जास्त प्रमाणात उद्भवले नाहीत. मातांनी बालकांची विशेष काळजी घ्यावी.- डाॅ. किरण बगाडेबालरोग तज्ज्ञ, वाशिम