गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्हाभरात गुरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे लसीकरणास विलंब झाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतर तोंडखुरी, पायखुरी रोगावर नियंत्रणासाठी पुरेशा प्रमाणात लसीकरण करण्यात न आल्याने आता या रोगांचा प्रादुर्भाव गुरांवर होऊ लागला आहे. इंझोरी परिसरात अनेक गुरांना तोंडखुरी, पायखुरी रोगाची लागण झाली आहे. पशुसंवर्धन विभाग या प्रकाराबाबत अनभिज्ञच असून, गुरे दगावण्याची भीती असल्यामुळे पशुपालकांनी रविवारी खासगी पशुचिकित्सकांच्या मदतीने खर्च करून गुरांवर उपचार केले. तथापि, हा रोग संसर्गजन्य असल्याने इतर गुरांनाही याची लागण होण्याची भीती असल्याने पशुपालकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अद्याप शेकडो गुरांवर उपचार करणे बाकी असल्याने पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपचार व लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे.
^^^^^^
कोट: इंझोरी परिसरात गुरांना तोंडखुरी, पायखुरी रोगाची लागण झाल्याची माहिती आपल्यास पशुपालकांनी अद्याप दिली नाही. तथापि, गुरांना या रोगाची लागण झाली असल्याने तातडीने तपासणी करून आवश्यक उपचार केले जातील.
- डॉ. किरण जाधव,
पशुधन विकास अधिकारी, कोंडोली