शहराच्या तुलनेत ग्रामीण भागांत लोकसंख्या कमी असते, तसेच बाजारपेठा लहान असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढीस फारसा वाव मिळणे कठीण असते; परंतु ग्रामीण भागांतील जनतेचा शहरात विविध कामांसाठी होणारा प्रवास, तसेच नियमांच्या पालनाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागांत कोरोना संसर्ग आटोक्याबाहेर गेला आहे. त्यात मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यासह वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. आठवडाभरात जिल्ह्यात २७०५ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासनाने कठोर उपाय योजना सुरू केल्या आहेत.
-----------------
जिल्हा सीमेलगतच्या गावांची स्थिती गंभीर
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणाच्या बाहेर जात आहे. प्रामुुख्याने ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचा उद्रेकच सुरू असून, जिल्हा सीमेवर असलेली गावे कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. यात कारंजा तालुक्यातील धनज बु.सह काही गावांत कन्टेनमेंट झोनची संख्या लक्षणीय आहे, तर मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार या गावच्या सर्व सीमाच पाच दिवसांसाठी सील करण्यात आल्या आहेत. कारंजा तालुक्यातील कामरगाव, सोमठाणा, धनज बु, खेर्डा, उंबर्डा बाजार, बेंबळा, तर मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार, वनोजा या जिल्हा सीमालगतच्या गावांत आठवडाभरात १०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत.