दगडउमरा परिसरातील जांभरून जहागीर, फाळेगाव थेट, बाभूळगाव, आसरा पारडी इत्यादी परिसरात माेठ्या प्रमाणात साेयाबीनचा पेरा आहे. अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीनच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी खाऊन टाकल्याने शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यानच्या काळात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी केली आहे.
कृषी सहायक सुनीता वानखेडे यांनी सांगितले की, सध्या ढगाळ वातावरण आहे, ते अळीला पोषक असल्यामुळे अळीचे प्रमाण वाढले आहे. जि. प. सदस्य अर्चनाताई दिगंबर खोरणे व दिगंबर खोरने यांनी देखील शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. शासनाच्या वतीने योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.