वाशिम : डिझेल व अन्य खर्चात झालेली वाढ यामुळे खासगी पाणी टँकर्सच्या शासकीय दरात वाढ करण्यात आली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या १९ डिसेंबर २०१८ च्या सुचनेनुसार यापुढे खासगी टँकर्स मालकांना वाढीव दरानुसार मोबदला मिळणार आहे.पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागात खासगी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जातो. यासाठी शासकीय दर ठरवुन दिले आहेत. अलिकडच्या काळात डिझेल व अन्य खर्चात वाढ झाल्याने पाणी टँकर्सच्या शासकीय दरात वाढ करण्याची मागणी समोर आली होती. या पृष्ठभूमीवर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने शासकीय दरात वाढ केली आहे. १ मेट्रीक टन वहन क्षमता असलेल्या वाहनाचे भाडे प्रतीदिन यापुर्वी १५८ रुपये मिळत होते , आता २७० रुपये मिळणार आहेत. तसेच यापुर्वी प्रती कि़मी. २ रुपये असलेले भाडे आता प्रती कि़मी. ३.४० रुपये करण्यात आले आहे . तसेच तीन हजार ते पाच हजार लिटर्स पाणी टाकी वहन करण्याची क्षमता असलेल्या वाहनाला यापुर्वी प्रतिदिन भाडे १९८ रुपये होते. आता ३३८ रुपये भाडे मिळणार आहे. याच वाहनाला यापुर्वी प्रती कि़मी. २.५० रुपयाप्रमाणे भाडे मिळत होते. आता प्रती कि़मी. ४.३० रुपये भाडे मिळणार आहे. जिपीएस प्रणाली बसविलेल्या वाहनांमधूनच पाणी पुरवठा करण्यात यावा, असेही बजावण्यात आले आहे.शासनाच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. या सुचनांप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल.- निलेश राठोड, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प.वाशिम
खाजगी पाणी टँकर्सच्या शासकीय दराला महागाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 3:43 PM