लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पश्चिम वऱ्हाडात गेल्या आठवड्यात सतत आठवडाभर पावसाची रिपरिप सुरु राहिल्याने हळदीच्या पिकावर विपरित परिणाम होऊन करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.्रगेल्या काही वर्षांत पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात हळद या मसालावर्गीय पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिन्ही जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रात यंदाही हळदीची लागवड झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्याच्या उत्तरार्धापासून इतर खरीप पिकांसाठी विपरित वातावरण असले तरी, हळदीसाठी ते वातावरण पोषक ठरल्याने हळदीचे पीक चांगलेच बहरावर आले आहे. आता हळदीचे कंद परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना गत आठवड्यात पश्चिम वºहाडात पावसाने रिपरिप सुरू केली. त्यामुळे काढणीवर आलेल्या उडिद, मुग पिकांना फटका बसलाच त्याशिवाय अति पावसामुळे हळदीवरही करपा रोगाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. या रोगावर नियंत्रणासाठी शेतकरी विविध प्रयोग करीत असले तरी, त्याचा काहीच फायदा होत नसल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी हळदीच्या पिकाची पाहणी करून करपा रोगावर नियंत्रणासाठी मार्गदर्शन करीत आहेत. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार करपा रोगावर बोर्डो मिश्रणाची फवारणी करणे अतिशय फायदेशीर राहणार आहे. चुना व मोरचूदच्या सहाय्याने बोर्डो मिश्रण तयार करून फवारणी करणे, हा यावर चांगला उपाय ठरू शकतो.
हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 3:19 PM