वाशिम : अनुसूचित जाती उपयोजना सन २०२०-२१ या वर्षात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांवर आधारित जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘समता’ या घडीपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात करण्यात आले. या एकाच घडीपुस्तिकेत समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजकल्याण विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीचा समावेश ‘समता’ या घडीपुस्तिकेत करण्यात आला आहे. यामध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, अनुसूचित - जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, दुभत्या जनावरांचे गट वाटप, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, सफाई कामगारांच्या मुला-मुलींसाठी पब्लिक स्कूल, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आदी योजनांची माहिती या घडीपुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. सोबतच योजनेचा उद्देश, अटी व लाभाच्या स्वरूपाबाबतची माहितीसुद्धा यामध्ये देण्यात आली आहे.