लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वाशिम ते कन्याकुमारी या उत्तर दक्षिण टोकाला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षीत नरखेड-वाशिम या नवीन रेल्वे मार्गाची त्रिसदस्यीय समितीव्दारे पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भ-मराठवाड्याच्या विकासाला चालना देणाऱ्या या रेल्वेमार्ग निर्मितीच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या संदर्भात रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून या मार्गाच्या निर्मितीसाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे. नकारात्मक सर्वेक्षणामुळे ३० वर्षांपासून मागे पडलेल्या नरखेड ते वाशिम व्हाया कारंजा-मंगरुळपीर या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे. भविष्यात वाशिम ते अमरावती हा रेल्वेमार्ग अस्तित्त्वात आला तर तो पश्चिम विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग ठरून उद्योग क्षेत्रासाठी भरभराटीचा ठरणार आहे. मागील ३० वर्षापासून नरखेड-वाशिम रेल्वेमार्गाचा मुद्दा मागे पडला होता; परंतु ९ जुलै रोजी रेल्वे अधिकारी यांच्या एका सर्वेक्षण पथकाने जिल्ह्यात भेट देऊन या मार्गासंदर्भातील काही कागदपत्रे गोळा करून कृती समितीच्या सदस्यांशी चर्चाही केली. यामुळे या मार्गासाठी पुढाकार घेणारयासह जिल्ह्यातील युवा मंडळीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगरूळपीर येथील तालुका रेल्वे कृती समितीच्यावतीने उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्यामार्फत १५ जुलै रोजी रेल्वेमंत्र्यांकडे निवेदन पाठवित हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास वाशिम जिल्ह्यातील शेतकरयाना देशातील उत्तर दक्षिण अशा दोन्हीकडच्या बाजारपेठा उपलब्ध होणार असल्याने या रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे, तर या मार्गाच्या निर्मितीसाठी सकारात्मक पद्धतीने पाठपुरावा करण्यासाठी तालुका रेल्वे कृती समितीच्या अध्यक्षपदी राम ठाकरे यांच्यासह इतर सदस्यांची निवडही करण्यात आली. या रेल्वेमार्गाची मागणी जोर धरत असतानाच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र सादर करून विदर्भ-मराठवाड्याच्या विकासास चालना देणाऱ्या या मार्गाच्या निर्मितीसाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे.
नरखेड-वाशिम रेल्वेमार्गासाठी अमरावतीच्या खासदारांचाही पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:05 PM