लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: अमरावती विभागात शेतकरी नैसर्गिक आपत्तीनी बेजार झालेला आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, मुग, उडिद, या पिकांना मोठा फटका बसला असताना आता कपाशीवर रस शोषक अळीसह शेंद्री बोंडअळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे कृषी विभागाच्या पीक पाहणीत आढळले आहे. या किडी नुकसानाची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नोंदविला आहे.यंदाच्या हंगामातील कपाशीचे पीक पात्या, बोंडावर आले आहे. या पिकावरील किडींचा प्रादूर्भाव नियंत्रीत करण्यासाठी शेतकरी बांधव विविध कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. दरम्यान, पिकांवरील किडरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (क्रॉपसॅप) कृषी विभागाकडून कपाशीच्या पिकाची पाहणी करण्यात येत आहे. त्यात गत आठवड्यापर्यंत केलेल्या पाहणीत राज्यातील २० जिल्ह्यात कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळून आला होता. आता कपाशीच्या पिकावर शेंद्री बोंडअळीसह रसशोषक अळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, बहुतांश भागांत या किडी नुकसानाची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर नोंदविला आहे. त्यामुळे यंदाही बोंडअळीमुळे कपाशीच्या उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली आहे.
सद्यस्थितीत कपाशीचे पीक पात्या आणि बोंडधारणेच्या अवस्थेत आहे. पिकाची स्थिती उत्तम असली तरी, जिल्ह्यातील काही तुरळक ठिकाणी कपाशीवर बोंडअळी आणि रसशोषक अळीचा प्रादूर्भाव आढळून येत आहे. एखाद, दोन ठिकाणी या किडींचे प्रमाण नुकसान पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असून, शेतकºयांना या संदर्भात मार्गदर्शन करून फेरोमन सापळ्यांचे वितरण कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम