वाशिम: केंद्र शासनाच्या आज्ञावलीनुसार उपलब्ध करण्यात आलेली खते आणि प्रत्यक्षात असलेला खतांच्या साठ्याची तपासणी करण्याचे निर्देश विभागीय कृषी सहसंचालकांनी अमरावतील विभागातील पाचही जिल्हा परिषदांच्या कृषी विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. या तपासणीचा अहवालही ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्याच्या सुचना त्यांनी २३ सप्टेंबर रोजीच्या पत्रान्वये दिल्या आहेत.केंद्रशासनस्तरावर १५ सप्टेंबर रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये रब्बी हंगामासाठी महाराष्ट्र राज्यातील खत उपलब्धतेबाबत चर्चा झाली. या बैठकीत केंद्रशासन संचलित आज्ञावलीवरून खतसाठा उपलब्धतेबाबत तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार विभागीय कृषी सहसंचालकांनी कृषीमंत्री ाणि कृषी सचिवांनी दिलेल्या सुचनेंतर्गत अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या पाचही जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकाऱ्यांना २३ सप्टेंबर रोजी पत्र पाठवून त्यांच्या जिल्ह्यातील उपलब्ध खतसाठ्याची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या तपासणीदरम्यान ईपॉस मशीन संंबंधित विके्रत्यांनी कार्यान्वित केली की नाही, त्याची खात्री करून घेण्यासह कोणत्याही परिस्थितीत या मशीन नादुरुस्त राहणार नाहीत व यापुढे आॅफलाईन विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही कृषी सहसंचालकांनी दिले आहेत.
अमरावती विभागातील खतांच्या साठ्याची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 4:38 PM