लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : शिरपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास दोन हजारावर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान, तपासणी केलेल्या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मागील चार महिन्यांपासून सर्वत्र कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले; मात्र शिरपूर गाव कोरोनापासून मुक्त होते. १६ जुलै रोजी गावातील एक जण रॅपिड अॅन्टिजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर १० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शिरपूरवासियांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. आतापर्यंत दोन हजारावर नागरिकांची तपासणी पुर्ण झाली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
शिरपूर येथे दोन हजारावर नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 5:00 PM