लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी १५ आॅक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयांतबरोबरच शाळा, महाविद्यालयांत एकत्रित बसून अर्धा तास ‘वाचन ध्यास’ उपक्रम राबविण्यात आला.माजी राष्ट्रपती स्व. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टिकोनातून १५ आॅक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धींगत करण्याच्या दृष्टिने शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालयांत १५ ते १९ आॅक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम साजरे केले जाणार आहेत. १५ आॅक्टोबर रोजी ग्रंथदिंडी काढून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. याच दिवशी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कामकाजाच्या वेळेत अर्धा तास वाचनासाठी दिला. १६ आॅ््क्टोबर रोजी शाळेत ग्रंथाचे प्रदर्शन भरविणे, १७ आॅक्टोबर रोजी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आपले मित्र, कुटूंबातील सदस्य आदींना किमान एक पुस्तक भेट देणे, १८ आॅक्टोबर रोजी साहित्यिक,कवी, लेखक, लेखन साहित्यात रूची असणा-या शिक्षकांची व्याख्याने तसेच परिसंवाद, मुलांशी हितगुज आयोजित केले जाणार आहे. १९ आॅक्टोबर रोजी शाळा, महाविद्यालय परिसरात डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम वाचन कट्टा निर्मिती करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून शाळांना देण्यात आल्या. वाचन प्रेरणा दिनानिमित्त १९ आॅक्टोबर दरम्यान नियोजित कार्यक्रमानुसार उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व शाळा, महाविद्यालयांना दिल्या आहेत, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी सांगितले.
शाळा, महाविद्यालयांत वाचन प्रेरणा दिनी ‘वाचन ध्यास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 2:51 PM