लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या निर्णयानुसार, जिल्ह्यात महसूल मंडळनिहाय हवामान तपासणी केंद्र स्थापनेच्या प्रक्रियेला वेग मिळाला आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांच्या स्थापनेसाठी जागा निश्चित करण्यात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करून जिल्ह्यातील सर्वच ४६ मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रांसाठी स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी पुढील कार्यवाहीसुद्धा सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी देण्यात आली. स्वयंचलित हवामान केंद्रांसाठी जागा निश्चितीकरणात निर्माण झालेल्या तिढ्याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. महाराष्ट्रात सुमारे २,०६५ हवामान केंद्र सार्वजनिक खासगी भागीदारी (पब्लिक प्रायव्हेटर पार्टनरशिप) मॉडेल येणार आहेत. यातील १ हजार केंद्र चालू महिन्याच्या अखेरपर्यंत अर्थात जून २०१७ पर्यंत स्थापित होण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा आणि शेती उद्योग यशस्वीपणे करता यावा म्हणून शासनाने राज्यभरातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील ४६ मंडळात ही हवामान केंद्र स्थापन होणार आहेत. तथापि, हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्थळांचे निश्चितीकरण करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत केवळ १६ स्थळे निश्चित होऊ शकली होती. संबंधित विभागांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार कार्यवाही करून त्यांच्याकडे या संदर्भातील अहवाल सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर कृषी आणि महसूल विभागाकडून आता उर्वरित ३६ स्थळे निश्चित करण्यात आली असून, स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यासाठी त्या सर्वच ठिकाणी पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. राज्यात हवामान केंद्रांची स्थापना करण्यासाठी शासनाचा स्कायमेट कंपनीशी करार झाला आहे. शेतकऱ्यांना मिळेल अचूक माहिती हवामानाचा अंदाज यावा म्हणून राज्यात पूर्वी एकूण ८ हवामान केंद्रे होती; मात्र शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा आणि आपला शेती उद्योग यशस्वीपणे करता यावा, यासाठी राज्य शासनाने राज्यात २ हजार हवामान केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. यामुळे वाऱ्याची दिशा, वाऱ्याची गती, हवेचे तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि पावसाचे परिमाण मोजले जाईल. ही माहिती शेतकऱ्यांबरोबर शेअर केली जाईल, ज्यामुळे त्यांना हवामानाच्या अनुसार उत्तम व नियोजनबद्ध पद्धतीने पेरणी करता येईल. शेतकऱ्यांसाठी विविध क्षेत्रातील हवामानविषयक स्थिती महावेध पोर्टल (महाराष्ट्र कृषी हवामान माहिती नेटवर्क) आणि स्कायमेटच्या मोबाइल अॅप्लिकेशनवर उपलब्ध असेल.
स्वयंचलित हवामान केंद्र स्थापनेचा तिढा सुटला!
By admin | Published: July 05, 2017 1:17 AM