...............
अकोला-पूर्णा पॅसेंजर गाडी बंद
अनसिंग : वाशिममार्गे अकोला-पूर्णा, पूर्णा-अकोला, अकोला- परळी, परळी-अकोला या पॅसेंजर रेल्वे धावत होत्या. आता या रेल्वे गाड्या बंद आहेत. यामुळे प्रवाशांना बसने प्रवास करावा लागत आहे. बसचा प्रवास महागडा असल्याने रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून हाेत आहे.
................
विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले
ताेंडगाव : अनुसूचित जमाती प्रवर्गातील (एसटी) विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत इयत्ता पहिली आणि दुसरीत सन २०२१-२२ या सत्रात मोफत प्रवेश दिला जाणार असून, यासाठी अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने केले आहे.
................
‘नो पार्किंग’मधील वाहने हटविली!
वाशिम : जिल्हा परिषद परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडत असून, ‘नो पार्किंग’मध्येच वाहने उभी केली जात हाेती. यामुळे येथे येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत हाेता. यासंदर्भात ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले हाेते. सद्यस्थितीत नाे पार्किंगमध्ये वाहने ठेवण्यात येत नसल्याचे दिसून आले.
...............
दरराेज पाणी पुरवठा करण्याची मागणी
रिसाेड : प्रकल्पात पुरेशा प्रमाणात जलसाठा असूनही भर जहगीर येथे ग्रामपंचायतीतर्फे दोन दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. भर जहागीर येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठ्याची सोय झाली आहे. त्यामुळे दरराेज पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
................
रीडिंग न घेताच वीज ग्राहकांना देयके
शेलुबाजार : रीडिंग न घेताच वीज ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज देयके आकारून ग्राहकांची लूट केल्या जात असल्याचा प्रकार महावितरणकडून सुरूच असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात गतवर्षात ३९१ तक्रारी रीडिंग न घेता देयक दिल्याच्या झाल्या आहेत. तरीही महावितरणकडून अनेक ग्राहकांना अंदाजे देयक देण्यात येत आहे. महावितरणने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
..............
मालेगाव-किन्हीराजा रस्त्यावर खड्डे
मालेगाव : मालेगाव ते किन्हीराजा रस्त्यावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना संबंधितांकडून काेणत्याच प्रकारची दखल घेण्यात येत नसल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दरराेज वाहनांचे नुकसान व अपघात घडत आहेत. अखेर परिसरातील शेतकऱ्यांनी खड्डे बुजविले आहेत.