वाशिम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. १२ महसूल मंडळांमध्ये एकाच दिवशी ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्या मंडळांमधील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी १६ जून रोजी दिले. खरीप हंगाम, कोरोना सद्य:स्थिती यासह इतर विषयांचा आढावा घेण्यासाठी १६ जून रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित सभेत ते बोलत होते.
आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, कृषी विकास अधिकारी विकास बंडगर या सभेला उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, आगामी काळात रासायनिक खतांची मागणी वाढणार असल्याने खतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. बियाणे, खते मिळाले नाहीत, अशी कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. १२ महसूल मंडळांमधील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाला सदार करावा. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी रस्ते, पूल वाहून जाण्याचे, पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. पावसामुळे नुकसानग्रस्त झालेले रस्ते, पूल यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करून वाहतूक पूर्ववत करावी, तसेच जिल्ह्यातील कमी उंचीच्या सर्व पुलांची पाहणी करून त्याठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे जमा झालेला गाळ, कचरा दूर करावा, असे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.
-----------------------------रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी
आमदार झनक म्हणाले, मुसळधार पावसामुळे शिरपूर ते वाशिम रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, संबंधित विभागाने सदर रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यावेळी कोरोना संसर्ग सद्य:स्थिती, लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. सध्या ४५ वर्षांवरील ५२ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पंत यांनी कोरोना लसीकरण मोहीम, जलसिंचन प्रकल्प दुरुस्ती आदी अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
पोलीस अधीक्षक परदेशी यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी माहिती दिली.