लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गणेशोत्सव काळात रोषणाई, झगमगाट तर असतोच शिवाय अलिकडच्या काळात विविध सामाजिक समस्यांवर नियंत्रणासाठी जनजागृतीपर कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात. याच्याही पुढे जाऊन वाशिम शहरातील महाराष्ट्र गणेश मंडळाने यंदा परिसरातील भाविकांना वर्षभरासाठी विमा सुरक्षा देण्याचा अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात शेतकरी आत्महत्या, पर्यावरण समस्यांसह बेटी बचाओ, बेटी पढाओसारख्या सामाजिक अभियानाबाबत अनेक गणेश मंडळे आपापल्या परिने जनजागृती करतात. त्यामध्ये वाशिम येथील महाराष्ट्र गणेश मंडळाचाही समावेश आहे. त्यानुसार या मंडळाच्यावतीने यंदा चक्क विविध प्रकारच्या १ हजार १११ रोपट्यांच्या ११ फुट उंच गणेश मूर्ती स्थापन करून आगळाच संदेश दिला आहे. एवढ्यावरच या मंडळाचे सामाजिक कार्य थांबले नाही, तर त्यांच्यावतीने यंदा परिसरातील गणेशभक्तांचा वर्षभरासाठी जीवन विमा उतरविण्यात येणार आहे. या गणेश मंडळाचे सदस्य गणेशभक्त राजुभाऊ मुठाळ यांचा यंदा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मुठाळ कुटुंबियांसह महाराष्ट्र गणेश मंडळाच्या सदस्यांसाठी निश्चितच दुख:दायक होती. असा प्रसंग ओढवल्यानंतर कुटूंबही हताश होत असते. ही बाब लक्षात घेत गणेश मंडळाच्या सदस्यांनी यंदा परिसरातील गणेशभक्तांचा वर्षभरासाठी जीवन विमा उतरविण्याचा निर्णय घेऊन स्व. राजुभाऊ मुठाळ यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे. गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र गणेश मंडळाकडे दरवर्षी २० ते २५ हजार रुपये वर्गणी जमा होते. या वर्गणीतून दहा दिवस रोषणाई, तसेच विविध उपक्रम राबवून उर्वरीत रक्कम विसर्जन मिरवणूकीवर खर्च करण्यात येत होती. यावर्षी मात्र अनाठायी खर्च टाळून मंडळाचे सदस्य गणेशभक्त स्व. राजुभाऊ मुठाळ यांना श्रध्दांजली वाहण्याच्या उद्देशाने परिसरातील गणेश भक्तांचा जीवन विमा उतरविण्यात येत आहे. या उपक्रमाला मंगळवारपासून सुरुवात होणार असून, विसर्जनाच्या दिवसापर्यंत गणेशभक्तांकडून विमा अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी प्रत्येकी १२ रुपये तर युवक,जेष्ठांसाठी प्रत्येकी ३२० रुपये भरणा करुन एक वर्षाचा विमा उतरविण्यात येणार आहे. त्यामुळे मंडळाचे सदस्य अथवा परिसरातील देणगीदार भाविकांवर वर्षभरात दु:खद प्रसंग ओढवल्यास त्यांना गणेश मंडळाने काढलेल्या विम्याचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र गणेश मंडळाचे अध्यक्ष रुपेश उर्फ बंटी वाघमारे यांच्यासह सदस्यांनी घेतलेला हा निर्णय खरोखर कौतुकास्पद आणि सर्वांसाठी आदर्श ठरावा, असाच आहे.
गणेशभक्तांना विम्याचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 7:29 PM
गणेशोत्सव काळात रोषणाई, झगमगाट तर असतोच शिवाय अलिकडच्या काळात विविध सामाजिक समस्यांवर नियंत्रणासाठी जनजागृतीपर कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात. याच्याही पुढे जाऊन वाशिम शहरातील महाराष्ट्र गणेश मंडळाने यंदा परिसरातील भाविकांना वर्षभरासाठी विमा सुरक्षा देण्याचा अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देसामाजिक जाणवाशिमच्या महाराष्ट्र गणेश मंडळाचा उपक्रम