वाशीम - शारीरीक अपंगत्व हे फक्त शरीराच्या एका भागाला कमजोर करते. मात्र बौध्दीक व मानसिक अपंगत्वाने मनुष्य पुर्णत: कमजोर होतो असे प्रतिपादन नेत्रदुत चेतन उचितकर ह्याने केले. काजळांबा येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजीत प्रबोधन कार्यक्रमात चेतन बोलत होता.
यावेळी व्यासपिठावर प्राचार्य आर.वाय. खांदवे, डॉ. बापूराव सोनटक्के, बाजार समिती संचालक बापूराव उगले, गंगाराम उगले, विठ्ठलराव गंगावणे, पायघन, देशमुख, जी.एम. राऊत आदींची उपस्थिती होती. चेतन सेवांकुर या दृष्टीहीन मुलांच्या प्रेरणादायी कार्यक्रमात शेतकरी आत्महत्या, व्यसनाधिनता, अभ्यासु वृत्ती, सकारात्मक दृष्टीकोन आदी विषयावर अंध कलाकारांनी अनेक विनोद, गाणी व भावपुर्ण व्याख्यान सादर करण्यात आले. यावेळी प्रविण काळे, कैलास पानबुडे, अमोल गोडघासे, संदीप भगत, दशरथ जोगदंड, विजय खडसे, विकास गाडेकर, लक्ष्मी वाघ, कोकल खांडेकर या दिव्यांगांचा व त्यांचे पालनपोषण करणारे पांडूरंग उचितकर यांचा शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. आपल्या अर्थपूर्ण व्याख्यानात पुढे बोलतांना चेतन म्हणाला की, मी व माझे सहकारी आंधळे आहोत. आम्हाला सृष्टी सौदयार्चा आस्वाद घेता येत नाही. जन्मदात्या मात्यापित्याला पाहता येत नाही. नातेवाईकांना बघता येत नाही. तुमच्यासारखे खेळता बागडता येत नाही. मनसोक्त फिरता येत नाही. तरी सुध्दा आम्ही यावर मात करुन भरभरुन आनंदाने जीवन जगत आहोत. तुम्ही मनमोकळेपणाने का जीवन जगत नाही असा विद्यार्थ्यांना सल्ला देत जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्यास या जगात अशक्य असे काहीच नाही, फक्त जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायला शिकले पाहीजे असे यावेळी चेतन म्हणाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रतन राठोड व उमेश देशमुख यांनी केले. शिक्षक यशवंत उजाडे यांनी बाल कलाकारांची ओळख करुन दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी.टी. म्हसाये, बी.एम. महाले, जे.एस. चव्हाण, एस.बी. लहुटे, एस.एन. पायघन, एच.पी. हांडे, व्ही.के. कापसे, ए.व्ही. गावंडे, के.के. सोनटक्के, प्रा. बी.बी. देशमुख, प्रा. आर.डी. काडोदे, सुरेश पाटील, भास्कर चौधरी आदींनी अथक परिश्रम घेते. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक वगार्ची भरगच्च उपस्थिती होती. वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.