जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया गत महिन्यात पार पडली, तर सरपंच पदाचे आरक्षणही आता जाहिर झाले आहे. यातील काही ग्रामपंचायतींचा समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग असून, यातील नवनियुक्त सदस्यांना समृद्ध गाव स्पर्धेविषयी संपूर्ण माहिती मिळावी आणि गावात विविध कामे करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पाणी फाऊंडेशन व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेऊन या नवनियुक्त सदस्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात हा उपक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत विहीर, कूपनलिका पातळी मोजमाप, हंगामनिहाय पीक माहितीचे फॉर्म कसे भरावे हे नवनियुक्त सदस्यांना सांगितले जात आहे. शिवाय समृद्ध गाव स्पर्धेमध्ये कोणती कोणती कामे करता येतील, मशीनच्या आधारे कोणकोणती कामे करता येतील, मनरेगामधून कोणती कामे करता येतील, यासंबंधी ग्रामसचिवांसह कृषी विभागाचे अधिकारी व पाणी फाऊंडेशनचे समन्वयक मार्गदर्शन करीत आहेत.
समृद्ध गाव स्पर्धेंंतर्गत नवनियुक्त सदस्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:37 AM