वाशिम : कोरोना विषाणुचा फैलाव होऊ नये याकरिता वर व वधुकडील मंडळीकडील १५ ते २० लोकांमध्ये लग्न करण्याचे ठरले असताना कोरोना विषाणुबाबत प्रशासनाची धावपळ व खबरदारी घेण्याच्या वारंवारील सूचना पाहता २५ मार्च रोजी हाताला मेंहदी व शरीराला हळद लागलेल्या वधु पुजा व वर ज्ञानेश्वरने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सर्व आप्तस्वकीयांना पुढील सुचनेपर्यंत लग्न स्थगित ठेवल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे आप्तस्वकीय यांनी कौतूक केले. अनेकांनी तुमच्या लग्नात यायचे कसा असा पेच निर्माण झाला होता; परंतु तुम्ही घेतलेला निर्णय हा सर्वाच्या हिताचा घेतल्याचे बोलून दाखविले.देवपेठ वाशिम येथील गजानन किसन पेंढारकर यांची कन्या तथा योग परिवारातील योगसाधिका लता उर्फ पूजा व महादेव काशिराम बनचरे रा. डोणगाव यांचा मुलगा ज्ञानेश्वरचा शुभविवाह २५ मार्च रोजी विठ्ठल मंदिर देवपेठ वाशिम येथे आयोजित होता. वर व वधुकडील १५ ते २० नातेवाईकांसह हा लग्न सोहळा उरकण्याचे ठरविले होते. परंतु कोरोनाबाबत प्रशासन घेत असलेली खबरदारी व आपल्यामुळे कोणाला ससंर्ग होऊ नये हा विचार करुन वर व वधुंनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला व आपल्या कुटुंबियांना याची कल्पना दिली. सर्वांच्या संमतीनंतर आपल्या नातेवाईकांना याची कल्पना देण्यात आली. या निर्णयाचे नातेवाईकांनी कौतूक केले असल्याची माहिती पतंजली योग शिक्षिका दीपा वानखडे यांनी दिली.