राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ६ फेब्रुवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर होते. रिसोड येथेही त्यांच्या उपस्थितीत तालुका मेळावा पार पडला. या दरम्यान तालुक्यातील राकाँच्या दाेन गटांत अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा रंगली होती. एका गटाकडून दुसऱ्या गटाला बाजूला ठेवल्याची चर्चा असून, राकाँच्या दुसऱ्या गटातील काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत नाराजीदेखील व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने आपल्या पद्धतीने मेळाव्याबाहेरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागत करून कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. त्यामुळे दोन गटांतील वाद जयंत पाटील यांच्यासुद्धा लक्षात आल्याचे बोलले जात आहे. राकाँच्या माजी तालुकाध्यक्षांसह अनेकजण मेळाव्याला गैरहजर राहिल्याची बाब हेरून प्रदेशाध्यक्षांनीदेखील नाराजी व्यक्त केली. तालुक्यात काही जण राकाँचा वापर केवळ स्वहितासाठी करीत असल्याचा आरोप माजी तालुकाध्यक्ष अंकुश देशमुख यांनी केला. आरोप-प्रत्यारोपामुळे राकाँच्या दोन गटांतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असून, राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगत आहे.
००००
राकाँच्या एका गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते हे पक्ष वाढविण्यासाठी गांभीर्याने काम करीत नाहीत. कोणत्याही निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवत नाहीत. त्यामुळे तालुक्यात अन्य पक्षांच्या तुलनेत राकाँचे वर्चस्व फारच कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रिसोड तालुक्यात बोटावर मोजण्याइतपतही पदाधिकारी, कार्यकर्ते निवडून येत नाहीत.
-- दिलीपराव बोरकर
माजी तालुकाध्यक्ष, राकाँ., रिसोड
०००
राकाँच्या तालुका मेळाव्याला सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बोलाविण्यात आले होते. मात्र, अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्याला आले नाहीत. रिसोड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून, रिसोड विधानसभा मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस, माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा गट असल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष कमी पडत आहे. आमच्यावर जे आरोप झाले ते साफ खोटे आहेत.
- तेजराव पाटील, तालुका अध्यक्ष राकाँ, रिसोड