वाशिम : कोविड संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आले आहे. हे चित्र सुखद असतानाच आता दुर्मिळ आजार असलेल्या स्क्रब टायफसने जिल्ह्यात शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन रुग्णांचे स्क्रब टायफसचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाशिम जिल्ह्यात कारंजा शहरातील ४५ वर्षीय व मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामीण भागातील एका ५० वर्षीय व्यक्ती अशा दोघांना गत महिन्यात स्क्रब टायफस झाल्याचे निष्पन्न झाले होते. एकाचा १७ ऑगस्ट तर दुसऱ्या व्यक्तीचा अहवाल २६ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आढळून आला.
या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना स्क्रब टायफसची लक्षणे असल्याने त्यांचे रक्तजल नमुन्याची खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विविध आजाराची लक्षणे असलेल्या १०० जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले होते. त्यातील ७५ नमुने डेंग्यू व चिकनगुनिया आजाराच्या निदानासाठीची होते. तर १५ नमुने स्क्रब टायफस आजाराच्या तपासणीसाठी घेण्यात आली होती. १२ जणांना डेंग्यू, ४ जणांना चिकनगुनिया तर २ दोन जणांना स्क्रब टायफस झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा एक जंतु संसर्ग आजार असून या आजाराचे लक्षणे हे देखील चिकनगुनिया सारखे असतात. हा आजार जलदगतीने वाढणारा आहे. योग्य वेळात आजारावर निदान झाले नाही तर ४० ते ५० टक्के मृत्यूची शक्यता बळावते. त्यामुळे स्क्रब टायफस होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आवाहन दरम्यान, उंदीर किंवा जंगलातील दाट गवतावरील एका प्रकारचा कीटक चावल्यावर यातील 'ओरिएंशिया सुसूगामुशी' नावाचा जिवाणू आपल्या शरीरात गेल्यावर हा आजार होतो. हा जिवाणू शरीरात गेल्यावर जवळपास ८ ते १० दिवसांनी ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे लक्षणे दिसताच नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एस.पी. बोरसे यांनी केले आहे.