०००
मनुष्यबळाअभावी कोळगाव उपकेंद्र बंदच!
मालेगाव : कर्मचारी पदभरती नसल्याने आणि कर्मचारी उपलब्ध न झाल्याने तालुक्यातील कोळगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंदच आहे. पदभरती झाल्यानंतर कोळगाव येथे कर्मचा-याची नियुक्ती केली जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
००००
६५ शेतक-यांची कृषीपंप जोडणी प्रलंबित
रिठद : रब्बी हंगाम सुरू झालेला असतानाही रिठद परिसरातील ६५ शेतकऱ्यांना अद्याप कृषीपंप जोडणी मिळाली नाही. प्रलंबित कृषीपंप जोडणीकडे महावितरणने लक्ष द्यावे, अशी मागणी नारायणराव आरू यांनी शुक्रवारी केली.
00
दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
केनवड : अनलॉकच्या टप्प्यात केनवड येथील बाजारपेठ पूर्वपदावर येत आहे. बाजारपेठेतील दुकानांमध्ये गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे ९ जानेवारी रोजी दिसून आले. कोरोनाचे गांभीर्य ओळखून नागरिक व दुकानदारांनी दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले.
00
कंत्राटदारांची देयके रखडली!
मेडशी : बांधकाम तसेच पाणीपुरवठा, सिंचनसंदर्भात कामे करूनही दोन महिन्यांपासून मेडशी परिसरासह जिल्ह्यातील कंत्राटदारांना देयके अदा करण्यात आली नाहीत. देयके अदा करण्याची मागणी कंत्राटदार संघटनेने शुक्रवारी बांधकाम विभागाकडे केली.
०००
कृषी योजनांसाठी अर्ज मागविले
किन्हीराजा : कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी किन्हीराजा मंडळातील शेतक-यांनी ऑनलाइन पद्धतीने महा-डीबीटी संकेतस्थळावर अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषी सहायकांसह कृषी विभागाने शनिवारी केले.
०००००
४३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
जऊळका रेल्वे : वाहन चालविताना सोबत कागदपत्रे न बाळगणे, ट्रिपल सीट, जादा प्रवासी वाहतूक याप्रकरणी जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांनी ८ व ९ जानेवारी रोजी ४३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.