लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वाशिम जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) या पदावर गृह विभागाने पालघर (मुंबई) येथील आयपीएस अधिकारी प्रियंका मिना यांची २९ जुलै रोजी नियुक्ती केली. यानिमित्ताने वाशिम जिल्ह्यात आता दोन महिला आयपीएस अधिकारी लाभल्या आहेत.वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून सदरचे पद रिक्त होते. राज्यातील सात रिक्त पदांवर गृह विभागाने २९ जुलै रोजी अधिकाºयांच्या नियुक्त्या केल्या. यामध्ये वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पालघर येथून प्रियंका मीना यांची नियुक्ती करण्यात आली. मीना या आयपीएस दर्जाच्या अधिकारी असल्याने जिल्ह्याच्या पोलीस दलात आता दोन आयपीएस अधिकाºयांचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय अधिकारी या तीनही पदावर महिला अधिकारी आहेत.उपविभागीय अधिकारीपदी थेट आयपीएस महिला अधिकाºयांची नियुक्ती झाल्यामुळे पोलीस अधीक्षकांना आता एक चांगला सहकारी लाभल्याच्या प्रतिक्रिया पोलीस दलात व्यक्त केल्या जात आहेत. दोन आयपीएस अधिकारी वाशिम जिल्ह्यात लाभल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील अवैध धंदेवाईकांचे चांगलेच धाबे दणाणून गेले आहेत. विशेष म्हणजे मीना यांचा परिविक्षाधीन कालावधी असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेची चोखपणे अंमलबजावणी होणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वाशिम पोलीस उपविभागीय अधिकारीपदी थेट आयपीएस अधिकाºयाची नियुक्ती झाल्यामुळे भ्रष्ट अधिकाºयांची चांगलीच पंचाईत झाली आहे. यानिमित्ताने वाशिम, मालेगाव व रिसोड तालुक्यात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध धंद्यावर अंकुश बसणार असल्याच्या चर्चेला आता उधान आले आहे.
आयपीएस मीना यांची ‘एसडीपीओ’पदी नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 2:46 AM