वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव वीज उपकेंद्रावरून होत असलेला पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्रस्त झालेल्या शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) कार्यकर्त्यांनी २९ नोव्हेंबरला कामरगावात रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे कारंजा- अमरावती मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी प्रभावित झाली होती.कृषीपंपाला सलग वीजपुरवठा मिळत नाही, जळालेले विद्युत रोहित्र तातडीने बदलून दिले जात नाही, स्वतंत्र गावठाण फिडर सुरू करावे आदी मागण्यांकडे महावितरणचे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याने शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कामरगाव शिवसेना शाखा व सर्कलच्यावतीने कामरगाव येथे बुधवारी रास्ता रोको केला.
ओव्हरलोड व जळालेले ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलून देणे ,कृषी पंपांना सुरळीत पूर्णवेळ वीज पुरवठा करणे, कामरगाव गावठाण हे स्वतंत्र फिडर सुरू करणे आणि कामरगावातील उपकेंद्रावरून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा मागण्या महावितरणपुढे ठेवण्यात आल्या. उपकार्यकारी अभियंता धर्मेंद्र राजपूत व कामरगाव वीज उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता दुधे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून पुढील काही दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.