मालेगाव पाटबंधारे उपविभागांतर्गत सोनल प्रकल्पातून शेलूबाजार परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. या पाण्याच्या आधारे पिंप्री अवगन, शेलूबाजार, लाठीसह परिसरांतील गावचे शेतकरी शेकडो हेक्टर क्षेत्रात सिंचन करून विविध पिके घेत आहेत. शेतकऱ्यांसाठी कालव्याद्वारे सोडण्यात येत असलेला पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर अनेक शेतकरी कालव्याचे मायनर बंद करीत नाहीत. त्यामुळे हे पाणी कालव्यातून बाहेर निघते आणि शेंदुरजना-शेलूबाजारदरम्यान वाहणाऱ्या एका नाल्यात येते. त्यामुळे खारी नाला म्हणून ओळखला जाणारा हा नाला, तुडुंब भरून वाहतो. प्रत्यक्षात या पाण्याचा अपव्यय होत असताना, या नाल्याच्या काठी शेती असलेले शेतकरी मात्र, या पाण्याचा सिंचनासाठी सदुपयोग करून विविध पिके घेत, आपला आर्थिक विकास साधण्याचा अभिनव प्रयोग करीत आहेत.
-------
पाणी अडविण्यासाठी बांधला बांध
सोनल प्रकल्पाच्या कालव्यातून वाहणारे अतिरिक्त पाणी खारीच्या नाल्यात येऊन वाहू लागते. या पाण्याचा शेती सिंचनासाठी वापर करणे शक्य व्हावे, म्हणून ते अडविणे गरजेचे असल्याने शेंदुरजना परिसरातील एक, दोन शेतकऱ्यांनी या नाल्यात सिमेंट बांधही उभारले आहेत. त्यामुळे कालव्यातून वाहत येणारे पाणी या नाल्यात मोठ्या प्रमाणात साचून राहते आणि शेतकऱ्यांना डिझेल इंजिनद्वारे उपसा सिंचन करण्यास आधार होतो.
=-----------
कोट: सोनल प्रकल्पाच्या कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. हे पाणी खारी नाल्यात वाहून येते. त्यामुळे नाल्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. या पाण्याचा सदुपयोग व्हावा आणि आम्हालाही रब्बीसह भाजीपाला पिके घेता यावीत, म्हणून आम्ही नाल्यातून डिझेल इंजिनने उपसा सिंचन करीत आहोत.
-सुखदेव सूर्यभान हरणे, शेतकरी शेंदुरजना मोरे