विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये ९ मोठे, २४ मध्यम आणि जवळपास ४७५ लघु प्रकल्प आहेत. या धरणांमधून प्रामुख्याने रब्बी हंगामातील पिकांना कालव्यांव्दारे तथा उपसा सिंचन पद्धतीने पाणी पुरविले जाते. दरम्यान, धरणांमधील पाणीसाठ्याच्या उपशावर नियंत्रण राहावे, सिंचनासाठी पाणी देत असताना प्रकल्पांचे व्यवस्थापन चोखरित्या सांभाळले जावे, धरणांच्या देखभाल - दुरूस्तीचा प्रश्न उद्भवल्यास तो तत्काळ सुटावा, धरणांची पातळी मोजणे आणि पाणीपट्टी वसुलीला गती मिळणे, आदी उद्देशांनी शासनाने १ एप्रिल २०१६ पासून सिंचन शाखा कार्यान्वित केल्या. त्यासाठी स्वतंत्ररित्या उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहायक अभियंता, विभागीय लेखापाल, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, टंकलेखक, लघुलेखक, संगणक चालक, वाहनचालक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार, कालवा टपाली, संदेशक नाईक, शिपाई, कालवा चौकीदार आदी पदांची गरज भासत असताना पुरेसे मनुष्यबळ अद्याप मिळालेले नाही. परिणामी, समस्या ‘जैसे थे’ आहे. वाशिम जिल्ह्यातील १० सिंचन शाखा कार्यान्वित असून, जवळपास ९० पदे रिक्त आहेत.
................................
कोट :
वाशिम जिल्ह्यात १० सिंचन शाखा कार्यान्वित आहेत. मात्र, त्यात जवळपास ९० पदे रिक्त आहेत. ५० टक्के प्रकल्प जलसंधारण विभागाकडे वर्ग केले आहेत. रिक्त पदे भरण्यात यावी, यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे.
- प्रशांत बोरसे
कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम