लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडविणे शक्य झाले असून हे पाणी यंदा उपसा पद्धतीने रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पुरविले जात आहे. यामुळे पैनगंगा नदीकाठी वसलेल्या शेतकºयांच्या एकरी उत्पन्नात भरघोस वाढ होईल, असे संकेत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी दिले.पैनगंगा नदीवरील बॅरेजेसमुळे आडगाव, कोकलगाव, गणेशपूर, सोनगव्हाण, टणका, ढिल्ली, राजगाव, वरूड, जुमडा, जयपूर आणि उकळी या ११ गाव परिसरांसह जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व नजिकच्या हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. मात्र, बॅरेजेस परिसरात विजेची प्रभावी सुविधा अद्याप उपलब्ध झाली नसल्याने शेवटच्या शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. असे असले तरी चालूवर्षीच्या पावसाळ्यात बॅरेजेस तुडूंब भरल्याने नदीकाठच्या सर्वच शेतकºयांना रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाकरिता उपसा पद्धतीने पाणी घेण्यास जलसंपदा विभागाने परवानगी दर्शविली. त्यामुळे शेतकºयांची सोय झाली असून एकरी उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विजेच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न प्रलंबित!बॅरेजेस परिसरात विजेच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ९२ कोटी रुपयांच्या प्रस्तावास शासनाने मंजूरी दिली. तसेच २५ कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला. मात्र, पायाभूत सुविधांचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे.
पैनगंगा नदीवरील बॅरेजेसमधून उपसा पद्धतीने सिंचन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 3:06 PM