लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या फेलोशिप योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामपरिवर्तकांनी परिश्रम घेऊन जिल्हयात निवड केलेल्या गावांमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणला. त्यामुळेच कारंजा तालुक्यातील ग्राम वाई आणि शेवती या दोन गावांमधील आदर्श अंगणवाडीला आयएसओ नामांकनाचा दर्जा प्राप्त झाला. याबाबतचे प्रमाणपत्र अंगणवाड्यांना प्राप्त झाले.महाराष्ट्र ग्राम सामाजीक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून व १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्राम वाई व शेवती येथे विविध कामे करण्यात आली. जलशक्ती मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टींग, रिचार्ज शॉफ्ट, नाला खोलीकरण, सीएनबीची कामे, सांडपाणी व्यवस्थापन, शोषखड्डे निर्मिती, शौचालय, धुरमुक्त किचन, क्रीडांगण विकास आदी सुधारणा करण्यात आल्या. आदर्श अंगणवाडी उपक्रमांतर्गत अंगणवाडीची रंगरंगोटी, सुशोेभिकरण, बोलक्या भिंती, वॉटर फिल्टर, बालसुलभ शौचालय व मुतारी, २४ तास विजेसाठी सोलार पॅनल, हॅन्डवॉश स्टेशन, डिजीटल अंगणवाडीसाठी एलईडी टीव्ही, मुलांसाठी लाकडी शैक्षणिक साहित्य, बालोद्यान साहित्य व अंगणवाडी इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टींग उपक्रम राबविल्यामुळे शिक्षणात आमुलाग्र बदल झाले. या सर्व बाबीमुळे दोन्ही गावातील अंगणवाड्यांना आयएसओ मानांकनाचा दर्जा मिळाला. यासाठी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक, जि.प. सीईओ दीपक कुमार मीना, जिल्हा समन्वयक वासुदेव डोने यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे गौरव खुळे व शेवतीचे नितीन भालेराव यांनी परिश्रम घेतले.
वाशिम जिल्ह्यातील दोन अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 3:40 PM