लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याची मागणी प्रलंबित असून, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २० जानेवारीला धनगर आरक्षण आक्रोश महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्याच्या अनुषंगाने ७ जानेवारीला रात्री ८ वाजताच्या सुमारास वाशिम येथे समाजबांधवांनी बैठक घेत पुढील रुपरेषा निश्चित केली.भारतीय राज्यघटनेत कलम ३४२(१) अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या अनूसूचित जमातीच्या यादीत ओरॉन, धनगर (धनगड) जमातीचा समावेश असून येथील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने महाराष्ट्रात ‘धनगड’ अस्तिवात नसताना ‘धनगर-धनगड’ वेगवेगळ्या जमाती असल्याच्या ठरवून गेली ६५ वर्षापासून धनगर जमातीला एसटी आरक्षणापासून वंचित ठेवले, असा आरोप करीत धनगर समाजबांधवांनी आरक्षणासाठी आता एल्गार पुकारला आहे.आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात मागील कित्येक वर्षांपासून धनगर समाजबांधवांकडून मोर्चे, धरणे, रस्तारोको, निवेदने आदी प्रकारातील आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधन्याचे प्रयत्न झाले. मागील २०१४ निवडणूकीपुर्वी सत्तेतील भाजपा युती सरकारने धनगर आरक्षण प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये मार्गी लावू, असे आश्वासित केले होते. सरकारची ४ वर्ष उलटूनही आरक्षण अंमलबजावणीसाठी कुठलाही ठोस निर्णय अद्याप घेतला नाही. या प्रलंबित मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २० जानेवारी २०१९ रोजी धनगर आरक्षण आक्रोश महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हाभरात बैठका घेतल्या जात असून, ७ जानेवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास वाशिम येथे बैठक घेण्यात आली. या महामेळाव्यास धनगर समाजातील मान्यवर नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत,असे मान्यवरांनी सांगितले. वाशिम येथील आरक्षण महामेळाव्यास धनगर समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने हजर राहून समाजाची एकजुट दाखवावी असे आवाहन वाशिमचे नगरसेवक बालु मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती किसनराव मस्के, रवी लांभाडे, सुभाषराव शिंदे, बंडू वैद्य, विलास लांभाडे, बबनराव मिटकरी, महादेव लांभाडे, डॉ.गजानन ढवळे, मदनराव कोल्हे, विनोद मेरकर आदींनी केले आहे.
धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला; वाशिम येथे आरक्षण महामेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 1:44 PM