................
पांदन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील मोरगव्हाणवाडी येथील पांदन रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी १० ते १५ मीटर अंतराचे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
.................
उमरदरी येथे कोरोना लसीकरण
वाशिम : किन्हीराजा येथून जवळच असलेल्या उमरदरी येथे ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. या मोहिमेस गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
.................
संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी
वाशिम : कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहे. त्यानुषंगाने स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी केली जात आहे.
.............
शेलूबाजार परिसरात जंतुनाशक फवारणी
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावात स्वच्छता राखली जावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सोबतच शेलूबाजार परिसरात या आठवड्यात ग्रामपंचायतीच्यावतीने जंतुनाशकाची फवारणीही करण्यात आली.
...............
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून वाशिम तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागात बुधवारी रुग्णांची तपासणी करण्यात आली.
..................
हातपंपांची दुरुस्ती करण्याची मागणी
वाशिम : तालुक्यातील काही गावांमध्ये असलेले हातपंप बंद आहेत. ये-जा करणाऱ्या वाटसरूंना हातपंपावर पिण्यासाठी पाणी मिळावे, म्हणून हातपंप दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
.................
शाळा बंद, वर्गखोल्याही नादुरुस्त
वाशिम : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या २० पेक्षा अधिक वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी शासनाकडून निधीही मिळाला. त्यातून दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
.................
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहर परिसरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार विजय साळवे यांनी केले.
..............
मास्कच्या विक्रीत प्रचंड वाढ
वाशिम : कोरोनाचा आलेख वाढत असल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाचा मास्कचा वापर वाढलेला आहे. यामुळे बाजारपेठेत मास्कच्या विक्रीमध्ये गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे.
.............
पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी
वाशिम : शहर परिसरातील काही भागात असलेले विद्युत पथदिवे किरकोळ दुरुस्तीअभावी बंद आहेत. यामुळे विशेषत: रात्रीच्या सुमारास नागरिकांची गैरसोय होत आहे. पथदिवे दुरुस्तीची मागणी होत आहे.
.............
गुटखा पुड्यांची सर्रास विक्री
वाशिम : कडक निर्बंध लागू असल्याने मुख्य चौकांमधील पानटपऱ्या बंद असल्या तरी, गल्ली-बोळातील छोट्या दुकानांमध्ये गुटखा पुड्या मिळत असून विक्री सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे.