नंदकिशोर नारे वाशिम : कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि शिवसेना- भारतीय जनता पक्ष युतीत जागा वाटप कशाप्रकारे होते, यावरच येत्या विधानसभा निवडणुकीचे जिल्ह्यातील राजकीय चित्र ठरणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ३ पैकी २ जागा भाजपने तर काँग्रेसने एक जागा जिंकली होती. गेल्यावेळी भाजपा-शिवसेना दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते त्यामुळे आता जागा वाटपाचा गुंता होण्याची चिन्हे आहेत. २०१४ पूर्वी शिवसेनेच्या वाटयाला आलेला कारंजा मतदारसंघ आता पुन्हा आपल्याला मिळावा या साठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्यातरी दोन्ही मित्रपक्षातील इच्छुकांनी निवडणुकीच्या अनुषंगाने येथे मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सदर जागा भाजपाच्या वाटयास आल्यास येथे शिवसेनेमध्ये बंडखोरीची शक्यता वर्तविल्या जात आहे. भारिप-बहुजन महासंघाने (वंचित आघाडी) यावेळी कारंजा सर करण्यासाठी तयारी चालविली आहे.
वाशिम विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व असून या मतदारसंघात स्वपक्षातील इच्छुकांनी उमेदवारीमध्ये बदल करण्याची मागणी पक्षाकडे केल्याने विद्यमान आमदार लखन मलिकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस पक्षातर्फे सुध्दा या मतदारसंघात इच्छुकांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. येत्या निवडणुकीत भाजपाच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसच्यावतिने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.रिसोड विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. आमदार अमित झनक यांनी मोदी लाटेतही हा गड राखला होता त्यामुळे ते कसे आव्हान पेलतात हे पाहणे रंजक ठरेल.
काँग्रेसचे माजी राज्यमंत्री, खासदार अनंतराव देशमुख सद्यस्थितीत शांत दिसून येत आहेत. त्यांचे पुत्र अॅड. नकुल देशमुख निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांची भूमिकाही परिणाम करणारी ठरेल अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघावर शिवसंग्रामनेही दावा केला असल्याने युतीसमोरही पेच निर्माण होणार आहे.
२०१४मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय :रिसोड : अमित झनक (काँग्रेस) । मते : ७०,९३९ फरक १६,७०८.सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : कारंजा : युसूफ पुंजाणी(भारिप-बहुजन महासंघ) - ४,१४७ ( विजयी - राजेंद्र पाटणी, भाजपा).
एकूण जागा : ३ । सध्याचे बलाबल भाजप - २, कॉँग्रेस-१