- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मानवी जीवनमुल्यांचे सर्जक नक्षत्रं कवितेतून उगवतात. परंतु काही कविंनी उठबस कविता बनविणे सुरु केल्याने कविता नकोसे म्हणणारे अनेक जण आहेत. यामुळेच कवितेचा वाचक मर्यादित झालेला आहे. यासह तत्सम विषयांवर आंंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते , डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाडमय व सांस्कृतीक संवर्धन मंचचे अध्यक्ष तथा विद्रोही कवी महेंद्र ताजणे त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
कविता उदंडपणे लिहिली जातेय, कवितेच्या दर्जाबद्दल काय सांगाल?मुलत: कविता लिहिणे ही अतिशय गंभीर प्रक्रीया आहे आणि असते. भोवतीच्या जळत्या अरण्यात जगण्याचे अनेक जळते प्रश्न निराधर झाले आहेत. कवितेच्या माध्यमातून हा जटिल गुंता सोडविता येऊ शकते. कवितेचं अविष्करण उदंड पातळीवर होत असलं आणि तिच्या दर्जेच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित होत असले तरी आज लिहिली जाणारी कविता मला खूपच आश्वासक वाटते. आशय आणि रचनाबंधनेच्या पातळीवर विविधांगाने ती फुलत आहे. कवितेचा गाभा अथवा तिची मुल्यरचना अधिक सर्जनशिल होताना दिसते.
कवितेला बांधीलकी असू शकते का?कवी आणि कविची भूमिका या वेगळया दोन भूमिका असू शकत नाहीत. कविला कवितेतून वेगळं बाजुला काढता येत नाही. कविता हिच कविची भूमिका असते आणि कवी असणे ही सुध्दा एक भूमिकाच असते. भूमिकाविहिन कविता ही समुद्रात भरकटलेल्या नावेसारखी असते. दिशाहिनता जीवनाला विध्वंसक विवराकडे घेऊन जाते. दिशादर्शी कविता मानवी जीवनाला परिपूर्णत्वाकडे घेऊन जाते.
तुम्ही तुमच्या कविताकडे कसे बघता?मी कविता लिहितो म्हणजे माझ्या जखमी आयुष्याच्या तडफडीची जळती लिपी मी उदघोषित करीत असतो. व्यवस्थेने दिलेल्या सलत्या जखमा मला कविता लिहायला भाग पाडतात.
तुमच्या पुस्तकांना कोणते पुरस्कार मिळाले?पुरस्कार मिळण्यापेक्षा वाचकांच्या जया चांगल्या प्रतिक्रीया येतात तोच साहित्यीक, कवींसाठी उत्कृष्ट पुरस्कार असतो. तरी सुध्दा माझ्या ‘अस्वस्थ वर्तमानाच्या कविता’ संग्रहाला हिंगोली वाचनालयाच्या ‘मनोहर स्मृती पुरस्कार’ आणि ‘ग्लोबल महासत्तेचा इस्फोट’ या कविता संग्रहाला अमरावतीचा सुदाम सावरकर राज्यस्तरिय पुरस्कारा मिळाला आहे. यासह जिल्हास्तरावरील अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.. मानवी जीवनाचा सर्वांगिण आशय कवितेतून उगविला तर कविता वाचाविसी वाटते. कविता म्हणजे काय तर आपल्याला जे आवडते ते इतरांनाही आवडावे अशी कलाकृती म्हणजे कविता होय. मग ती कोणत्याही विषयावर असून शकते. प्रेम कवी खूप आहेत वास्तव मांडणारे कवी हवे आहेत.