- संतोष वानखडेवाशिम - घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे?, खासगी रुग्णालयातील मोठ्या शस्त्रक्रिया व उपचारासाठी पैसा नाही?, गंभीर आजारावरील उपचारासाठी पैशाची जुळवाजूळव करीत आहात? तर मग ही बातमी आवर्जून वाचा. सरकारच्या जनआरोग्य योजनेने पात्र लाभार्थींसाठी मोफत उपचार व शस्त्रक्रियेची सोय केली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ९७६ रुग्णांच्या उपचारापोटी शासनाने ९८ कोटींचा खर्च केला आहे.
केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जिल्ह्यात २३ सप्टेंबर २०१८ पासून राबविली जात आहे. या योजनेमध्ये १३५९ गंभीर आजारांवर ५ लाख रुपयापर्यंतच्या शस्त्रक्रिया व उपचार अंगीकृत शासकीय आणि खासगी रुग्णालयातून पूर्णतः मोफत केले जातात. हे आरोग्य विमा कवच प्रति कुटुंब, प्रति वर्ष पाच लाख रुपये मर्यादेत उपलब्ध करून देण्यात आले. सन २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जातीय सर्व्हेक्षणातून जिल्हयातील लाभार्थ्यांची जनआरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आली असून, जिल्हयात या योजनेसाठी ५ लाख ८ हजार ३५० लाभार्थी पात्र ठरले आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण १३ रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असून यामध्ये ३ शासकीय तर १० खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ९७६ रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, उपचारापोटी शासनाने ९८ कोटींचा खर्च केला.