शिरपुर जैन (वाशिम) - महाशिवरात्री उत्सवानिमित्त ६ मार्च रोजी शिरपूर गावातून जानगीर महाराज यांची भव्य पालखी शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्यानी सहभाग घेतला होता. जानगीर महाराज कि जय अशा घोषणांनी शिरपुरनगरी दूमदूमून गेली होती. शिरपूर वासियांचे आराध्य दैवत असलेल्या जानगीर महाराज संस्थानमध्ये महाशिवरात्रि उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. महाशिवरात्री उत्सवानिमित्त संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्रीमद् भागवत कथा, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम झाले. ५ मार्च रोजी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी संस्थांमध्ये जनसागर उसळला होता. त्यानंतर ६ मार्च रोजी सकाळी पाच वाजता संस्थांमधून विदर्भ मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्या व हजारो भाविकांच्या सानिध्यात जानगीर महाराज यांची पालखी शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. पालखी शोभायात्रा मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत असताना रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी झाली होती. यावेळी भाविकांनी पालखीचे स्वागत करून दर्शनाचा लाभ घेतला. जानगीर महाराज की जय अशा जयघोषाने शिरपुर नगरी निनादून गेली होती. दुपारच्या सुमारास जानगीर महाराज यांचे समकालीन मित्र हजरत मिर्झा बाबा यांच्या दर्गाहमध्ये शोभायात्रा नेण्यात आली. तेथील मुजावर यांच्या हस्ते पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले. नंतर पालखी बस स्थानक परिसरातून मंदिरासमोरून वेटाळ मार्गे जानगिर महाराज संस्थान मध्ये नेण्यात आली. तेथे संस्थांच्या वतीने मठाधिपती महेशगिर बाबा यांच्या हस्ते भजनी दिंड्यांची भेट वस्तू देऊन बिदागिरी करण्यात आली.
प्रकाश भालेराव परिवाराकडून चहापान, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अध्यक्ष विश्वनाथ भालेराव यांच्याकडून अल्पोहार, होळकर चौकामध्ये मसाला चना, महात्मा फुले वेटाळात दुपारचे जेवण, मराठा समाज बांधवांच्या वतीने बस स्थानक परिसरात चहापान, श्वेतांबर जैन संस्थांतर्फे अल्पोहार, लक्ष्मण बाविस्कर यांच्या तर्फे चहापान, युवा ग्रुप तर्फे औंढा विहिरीजवळ अल्पोहार देण्यात आला.