मालेगाव : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याकरिता २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ला मालेगाव शहर व तालुक्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला.जनता कर्फ्युकरिता मालेगाव शहरातील सर्व नागरिकांनी शनिवारपासूनच स्वयंफूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी सकाळपासूनच मालेगाव शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला. मालेगाव शहरात सकाळी सात वाजतापासून सर्वत्र सामसूम दिसून आली. एकही मनुष्य रस्त्यावर फिरकला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सगळीकडे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्त्यावर कुणी आढळले तर पोलिसानी त्यांना घरी जाण्यास सांगितले. दिवसभर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. सायंकाळी पाच वाजता अनेक लोक आपल्या घरासमोर गच्चीवर तसेच बाल्कनीमध्ये येऊन टाळ्या वाजून वाद्य वाजवून जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. कुणीही घराबाहेर न पडल्याने मालेगाव शहरात सर्वत्र शांतता पाहावयास मिळाली. जनता कर्फ्यूच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दाखवित रविवारी व्यापाºयांनी स्वयंस्फुर्तीने सर्व दुकाने बंद ठेवली. ग्रामीण रुग्णालय तसेच काही खासगी हॉस्पीटल सुरू होते. ग्रामीण भागात सुद्धा कुणीही शेतात गेले नाही तर अनेक ठिकाणी जनावरसुद्धा बाहेर चरायला नेली नाहीत. डॉ. निलेश मानधने यांनी मालेगाव शहरातील अत्यंत तातडीची गरज असलेल्या रुग्णांकरीता रविवारी मोफत रुग्णवाहिका व डॉक्टरची सोय केली. त्यांच्या या रुग्ण सेवेचे सर्वत्र कौतुक झाले.
जनता कर्फ्यूला मालेगावात १०० टक्के प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 4:27 PM