लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार, नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि वाशिम नगरपरिषद (राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १६ डिसेंबर २०१८ रोजी वाशिम येथे रोजगार व कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगार तसेच नोकरी इच्छुक युवकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज यांनी केले.जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार, स्वयंरोजगार व नोकरीचे दालन खुले करण्याचा प्रयत्न म्हणून सदर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात औरंगाबाद, पुणे, मुंबई, अमरावती, रांजणगाव, हैद्राबाद, पैठण, जळगाव, चाकण (पुणे), आदी ठिकाणचे उद्योजक सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध स्थानिक उद्योग सुध्दा रोजगार देण्यासाठी सहभागी होणार आहेत. इयत्ता १० वी उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण, १२ वी, कौशल्य विकास प्रशिक्षित (सर्व ट्रेड), आय. टी. आय. (सर्व ट्रेड), एम.सी.व्ही. सी., पदवीधर (कला, वाणिज्य, विज्ञान), बी.ई., बी. टेक., पदव्युत्तर पदवी आदी शैक्षणिक पात्रता असलेले किमान १८ ते ४० वर्षे वयोगटातील महिला व पुरुष उमेदवार या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. या मेळाव्यात जिल्हा समन्वयक, कॉम्प्युटर आॅपरेटर, एमआयएस समन्वयक, ट्रेनी, जॉब ट्रेनी आॅपरेटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, ट्रेनी इंजिनीअर, सिक्युरिटी गार्ड, सुपरवायझर, हेल्पर इत्यादी प्रकारचे १५०७ पेक्षा जास्त रिक्त पदांवर त्याच दिवशी मुलाखत व व तत्सम प्रक्रियाद्वारे निवड करण्यात येणार आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या सत्यप्रती, नुकतीच काढलेली दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, सेवायोजन कार्डसह १६ डिसेंबर २०१८ रोजी वाशिम येथील रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन बजाज यांनी केले.
सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगाराचे दालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 3:35 PM