वाशिम : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत डीएमएलटी व तत्सम शाखेत शिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी तत्त्वावरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अपात्र ठरविण्यात आल्याने उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मुक्त विद्यापीठाची पदवी ग्राह्य धरली जाते; मात्र प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी मुक्त विद्यापीठाचे उमेदवार अपात्र ठरविण्यात येतात, हा दुजाभाव कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत विविध शाखेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या, त्या शाखेतील पदविका, पदवीनुसार विद्यार्थी हे संबंधित पदाच्या परीक्षा, मुलाखतीकरिता पात्र ठरू शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यासह विविध स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय, निमशासकीय, कंत्राटी तत्वावरील पदांसाठी मुक्त विद्यापीठांतर्गत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना पात्र ठरविण्यात येते. वाशिम जिल्ह्यात नुकतेच जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, वाशिमअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान कोविड-१९ नुसार वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते. प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता डीएमएलटी पदविका, पदवीधर उमेदवारांनी अर्ज सादर केले. यामध्ये मुक्त विद्यापीठाच्या काही उमेदवारांचा समावेश होता. मात्र, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता मुक्त विद्यापीठांतर्गत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रावरील अनुभव नसल्याचे कारण समोर करीत मुक्त विद्यापीठाच्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले. यामुळे उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
00
कोट बॉक्स
प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता मुक्त विद्यापीठाच्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम.
०००
कोट बॉक्स
प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता मुक्त विद्यापीठाच्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत, या प्रकाराबाबत माहिती नाही. संबंधितांकडून माहिती घेतली जाईल.
- वसुमना पंत
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद वाशिम